(राजापूर / रत्नागिरी)
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे बौद्धवाडी येथे राहत्या घरी कॉटवरून खाली पडलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुनील केरू पवार (वय ५७, रा. ताम्हाणे बौद्धवाडी, ता. राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पवार हे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी कॉटवरून खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर शिवरी फाटा येथील स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ३१ मिनिटांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर राजापूर पोलिसांकडून नोंद घेण्यात आली.


