(अहमदाबाद / वृत्तसंस्था)
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी साबरमती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने त्याला विशेष अति-सुरक्षित विभागात हलवले आहे. ‘ब्लॉक २००’ अर्थात ‘दोनशे खोली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विभागात दहशतवादासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या किंवा दोषी ठरलेल्या २०० कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था आहे. सध्या लॉरेन्सला सुमारे ७.५ बाय ११ फूट आकाराच्या कोठडीत ठेवण्यात आले असून, त्याच्यावर चोवीस तास कडक देखरेख ठेवली जात आहे. बाहेरील जगाशी तसेच डिजिटल माध्यमांशी त्याचा संपर्क पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
साबरमती कारागृहातील ब्लॉक २०० हा उच्च सुरक्षा व्यवस्था असलेला विभाग आहे. कैद्यांमध्ये परस्पर संपर्क होऊ नये, यासाठी या विभागाचे चार स्वतंत्र उपविभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक उपविभागात ५० कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. २००८ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींसह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनाही या विभागात ठेवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ अंतर्गत, गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आणि कारागृह परिसरातून बाहेर जाण्यास बंदी असलेल्या व्यक्तींना सामान्यतः अशा विभागात ठेवले जाते.
यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई याला साबरमती कारागृहातील ब्लॉक १० मध्ये ठेवण्यात आले होते. हा विभागही अति-सुरक्षित असून, तेथे केवळ १० कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. साबरमती कारागृहात येण्यापूर्वी तो दिल्लीतील तिहार कारागृहासह पंजाबमधील विविध कारागृहांमध्ये होता. त्या काळात त्याच्याकडून बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधला जात असल्याचे आरोप समोर आले होते.
कारागृहात असतानाही खंडणीसाठी फोन करणे, आपल्या गुन्हेगारी नेटवर्कचा प्रभाव वाढवण्यासाठी धमकीवजा ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश पाठवणे, तसेच विविध कारागृहांतून मुलाखती देणे, अशा प्रकारांमुळे लॉरेन्स चर्चेत राहिला होता. कॉल सेंटरच्या मालकांना धमकावल्याच्या ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या होत्या. तसेच गँगस्टर शहजाद भट्टी याच्यासोबतच्या कथित संभाषणाचे रेकॉर्डिंगही उघड झाले होते.
मात्र, तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, २०२३-२०२४ पूर्वीच्या काळाच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत लॉरेन्सकडून कोणताही थेट फोन कॉल किंवा संवाद झालेला नाही. त्याच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या व्यापक सुरक्षा योजनेचा भाग म्हणून त्याला अधिक कडक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
सध्या लॉरेन्स बिश्नोई पूर्णपणे एकांतात राहत असून, त्याला बाहेरील जगाशी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. साबरमती कारागृहातील अति-सुरक्षित विभागात चोवीस तास त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे.


