(गडचिरोली / वृत्तसंस्था)
सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी माओवाद्यांनी जंगलात जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रसाठा गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने उद्ध्वस्त केला. मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्तीसगड सीमेवरील माचुवंचा जंगल परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पाच अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य आणि माओवादी वापरत असलेले साहित्य जप्त करण्यात आले.
आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगलांचा फायदा घेत माओवादी शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जमिनीखाली गुप्तपणे लपवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नक्षल सप्ताह किंवा निवडणुकांच्या काळात सुरक्षा दलांना लक्ष्य करून घातपात घडवण्यासाठी या साठ्याचा वापर करण्याची योजना असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे २७ ऑक्टोबर रोजी पहाटे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आले.
मोहिमेदरम्यान जवानांनी माचुवंचा जंगल परिसरात कसून शोध घेतला. त्यावेळी माओवाद्यांनी जमिनीखाली पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आढळून आला. या साठ्यात १२ नग क्लेमोर, एक १२-बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल्स, एक एअर गन, एक बॉटल स्फोटक, एक जिवंत क्लेमोर स्फोटक, एक वायरलेस माईक सेट, हत्याराचा एक लोअर हँडगार्ड, १०० सुतळी बॉम्ब आणि माओवादी गणवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या कापडाच्या पाच जोड्या यांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या साहित्यापैकी दोन स्फोटकांसह काही साहित्य सुरक्षेच्या कारणास्तव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आलेला शस्त्रसाठा शोधून निष्प्रभ करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. आणि उपअधीक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. सी-६० पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि इंटेलिजन्स सेलच्या (इंट सेल) जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.


