(सातारा)
महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. प्रतापगडाकडे जात असताना टाटा नेक्सन कार रस्त्यावरील लोखंडी संरक्षक ग्रील तोडून सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन कुटुंबांतील सहा जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत माधवराव पांढरीकर (७५), शरयू शशिकांत पांढरीकर (६५), निखिल शशिकांत पांढरीकर (रा. अमरावती) तसेच पल्लवी अभिजीत काशिकर (४४), यशवंत (११) आणि यक्षित (९, रा. पुणे) हे सर्वजण जखमी झाले आहेत. निखिल पांढरीकर आणि पल्लवी काशिकर यांची प्रकृती गंभीर आहे.
पांढरीकर आणि काशिकर कुटुंबीय कोल्हापूरहून गुरुवारी महाबळेश्वर येथे आले होते. दुपारी प्रतापगडाकडे जात असताना आंबेनळी घाटातील वळणावर तीव्र उतारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड आणि महाबळेश्वर रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दरीत उतरून बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातामुळे घाटात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे महाबळेश्वर पोलिसांना वाहतूक नियंत्रण करावे लागले.

विशेष म्हणजे, अपघातानंतर कारमधील ११ वर्षांच्या मुलाने प्रसंगावधान राखत ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. मात्र लहान मुलाचा आवाज आणि अपघाताचे अचूक ठिकाण न समजल्याने सुरुवातीला शोधकार्याला काहीसा विलंब झाला. परंतु, मुलाने दिलेली माहिती आणि जिद्दीने सुरू असलेल्या शोधकार्यामुळे अखेर मदत पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळ निश्चित होताच बचावकार्य वेगाने करण्यात आले. गाडीतील पाच प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत मदतीची वाट पाहत असताना, अंगावर काटा आणणाऱ्या या परिस्थितीतही त्या १० वर्षांच्या मुलाने हार मानली नाही. त्याने तातडीने ११२ हा आपत्कालीन क्रमांक फिरवला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी हा चिमुरडा ‘देवदूत’ ठरला आहे.
रेस्क्यू टीमने उपलब्ध साहित्याच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
या बचाव मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, सुनील केळगणे, दीपक ओंबळे तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव, संकेत सावंत, अजित जाधव, आदित्य बावळेकर आणि ओंकार शेलार यांचा सहभाग होता.
दरम्यान, आंबेनळी घाटात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

