(रत्नागिरी)
100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे. सर्वांची कामगिरी चांगली दिसत आहे. हीच ऊर्जा 100 दिवसांपूर्ती मर्यादित न ठेवता कायम ठेवावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी केली.
क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करत केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस विभागाची सादरीकरण केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्हा परिषदेचे सादरीकरण केले.
झालेल्या सादरीकरणावर समाधान व्यक्त करुन पालक सचिव श्रीमती व्यास म्हणाल्या, याच पध्दतीने विभाग प्रमुखांनी सविस्तर सादरीकरणाची तयारी ठेवावी. अचानकपणे कुणाच्याही कार्यालयाला भेट दिली जाईल. हा उपक्रम 100 दिवसांपुरता मर्यादित न ठेवता, त्यापुढे कायमस्वरुपी चालू ठेवावे. विशेषत: कार्यालयीन स्वच्छता आणि गुड गर्व्हनरसवर विशेष भर द्यावा. हीच ऊर्जा कायमस्वरुपी सर्वांनी ठेवावी, त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीला सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यानंतर श्रीमती व्यास यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, नगरपालिका प्रशासन, आस्थापना, उपचिटणीस, महसूल या शाखांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सभागृहाची पाहणी केली. केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करुन सर्वसामान्यांचे काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी विशेष सूचना केली.