(गणपतीपुळे / वैभव पवार)
‘माझं गाव – आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत तसेच मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचा एक भाग म्हणून गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर ४८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) कार्यालयात लोकजागृती फाउंडेशन, रत्नागिरी, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड आणि एमटीडीसी, गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदानाबाबत जनजागृती करणे आणि गरजू रुग्णांसाठी सुरक्षित रक्ताचा साठा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून रक्तदान केले, तर अनेकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या शिबिराचे नियोजन लोकजागृती फाउंडेशनचे संस्थापक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंडचे आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. आशिष खांडेकर, डॉ. अॅलिस डेव्हिड, अधिपरिचारक गणेश मोरे, जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रणाली आचरे, रक्तपेढी तंत्रज्ञ कृतिका राऊत, मदतनीस प्रमोद चाटे, साईदीप बारगुडे, प्रीतम भोसले, तसेच एमटीडीसीचे अधिकारी वैभव पाटील यांनी विशेष सहकार्य केले. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनीही शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, वैद्यकीय अधिकारी, एमटीडीसी प्रशासन, रक्तदाते आणि उपस्थित नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.

