(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गोविळ शिक्षण प्रसारक मंडळ, गोविळ संचलित श्री आदिष्टी विद्यामंदिर (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या पहिल्या बॅचमधील (१९९७) माजी विद्यार्थ्यांचा भावनिक आणि उत्साहपूर्ण आनंदमेळावा संपन्न झाला. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. याचबरोबर शाळेच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून लोखंडी कपाट व स्पीकर शाळेला भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजाराम बापू गुरव, सचिव मनोज लाखन, ग्रामस्थ, पालक तसेच शाळेचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आपल्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या विकासासाठी दरवर्षी असे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, अशी माहिती मुख्याध्यापकांच्या वतीने देण्यात आली.
शाळेला उपयुक्त भेटवस्तू दिल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच इतर माजी विद्यार्थ्यांनीही शाळेसाठी अशाच प्रकारे योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. या आनंदमेळाव्याचे नियोजन दीपक चव्हाण, पालो जया कांबळे, ज्योती कांबळे, योगेश गाडे, मनीषा कोटकर, नरेश वाजे, महेश दरडे, शुभांगी पवार व दिपाली शेलार यांनी केले.

