(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
पावसहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी सिटी बसला विश्वेश्वर घाटीतील चढावावर अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या डाव्या बाजूला मोरीसाठी ठेवलेल्या सिमेंटच्या पाइपला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बसचेही नुकसान झाले आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी बसचालक राजेश भगवानराव सोनकांबळे (वय ४५, सध्या रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पावस ते रत्नागिरी मार्गावरील विश्वेश्वर घाटीच्या पुढील चढावावरून एसटी सिटी बस (एमएच १४ बीटी ४४६५) जात असताना चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. त्यातून बसची सिमेंटच्या पाइपला धडक बसून अपघात झाला. या अपघातात सीमा विश्वनाथ उबारे (वय ५७), गायत्री शैलेश शिंदे (वय ३०) आणि रामदास दत्ताराम शेलार (वय ६५, सर्व रा. वायंगणी, उबारेवाडी, रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र मोहन पारकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


