(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे नाखरेकरवाडी येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेत आरोपीने घरात घुसून कोयत्याने मारहाण केली, ज्यात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता घडली.
फिर्यादी विजय जगन्नाथ नाखरेकर (वय ६०, मिरजोळे नाखरेकरवाडी) यांच्या वतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अभिषेक विजय नाखरेकर (वय २९, मिरजोळे नाखरेकरवाडी) हा घरात घुसला आणि त्याने घराच्या जिन्याजवळ ठेवलेला कोयता उचलून अचानक विशाखा विजय नाखरेकर (वय ५५) आणि जयवंत बारक्या नाखरेकर (वय ६५) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरी शहर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.