(संगमेश्वर / प्रतिनिधी)
श्री गणरायाच्या चरणी भक्ती आणि पुराणकथेचा सुंदर संगम साधत संगमेश्वर तालुक्यातील माभळे-जाधववाडी येथील दुर्वेश प्रकाश गिते यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘समुद्र मंथन’ या पुराणकथेवर आधारित आकर्षक देखावा साकारला आहे.
या देखाव्यात देव आणि दानवांनी केलेले समुद्र मंथन, वासुकी नाग, मंदार पर्वत तसेच भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले आहे. अमृतप्राप्तीसाठी झालेल्या समुद्र मंथनानंतर अमृताचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे मनमोहक रूप धारण करून देवांना अमृत प्राप्त करून दिल्याचा प्रसंगही देखाव्यात कलात्मक पद्धतीने साकारण्यात आला आहे.
पुराणकथेतील विविध प्रसंगांची आकर्षक मांडणी, सजावट आणि मूर्तींची कल्पक रचना यामुळे ‘समुद्र मंथन’चा हा देखावा गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पुराणातील प्रसंग जिवंत भासतील अशा पद्धतीने करण्यात आलेली मांडणी हे या देखाव्याचे वैशिष्ट्य ठरत आहे.
दुर्वेश गिते हे दरवर्षी गणेशोत्सवात मेहनत घेऊन काहीतरी वेगळे आणि नावीन्यपूर्ण साकारण्याचा प्रयत्न करतात. यंदाही त्यांनी पुराणकथेतील महत्त्वपूर्ण प्रसंग निवडून त्याचे आकर्षक स्वरूपात सादरीकरण केले आहे. हा देखावा साकारताना दुर्वेश यांना त्यांच्या मित्रपरिवाराचीही मोलाची साथ मिळाली. मित्रांनी दिलेल्या सहकार्यामुळे त्यांच्या कल्पकतेला अधिक बळ मिळाले असून ‘समुद्र मंथन’च्या देखाव्याला अधिक उठाव आला आहे.


