(रत्नागिरी / वार्ताहर)
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅम्पस से संसद’ या उपक्रमात रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी श्रावणी प्रभुमहाजन हिने सहभाग नोंदवला. युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, त्यांच्यातील विविध कौशल्यांचा विकास घडवणे आणि राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवणे, या उद्देशाने राज्यसभा खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आणि विद्यार्थी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांतून निवड करण्यात आली. या प्रक्रियेतून राज्यातील एकूण ३१ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय संसद, राष्ट्रपती भवन तसेच नवी दिल्लीतील विविध ऐतिहासिक वारसास्थळे आणि संशोधन संस्थांना भेटी दिल्या.
या उपक्रमांतर्गत केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक मान्यवरांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या भेटींदरम्यान देशासमोरील विविध प्रश्न आणि समकालीन घडामोडींवर विचारमंथन करण्यात आले. उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने अभ्यास किट आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
या अभ्यास दौऱ्याचे समन्वयक म्हणून महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख नीलेश पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. श्रावणीला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे, इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, डॉ. सीमा वीर, प्रा. अक्षय झोरे, कार्यालयीन कर्मचारी आणि पालक यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई तसेच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. सीमा कदम यांनी श्रावणी प्रभुमहाजन हिचे अभिनंदन केले.


