(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी आणि सदस्यांची संयुक्त सभा गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, मिथिला हॉटेल शेजारील शेषराम हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सभेत १६ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य मेळाव्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक समता मार्च कार्यक्रमाची माहिती देऊन त्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
या सभेला रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या कार्यकारिणी व सदस्यांसह मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांतील तालुकानिहाय कार्यकारिणी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके आणि जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांनी केले आहे.

