(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, निष्ठावंत शिवसैनिक मयुरेश्वर पाटील यांची रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत तसेच रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या शिफारसीनंतर ही जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली.
मयुरेश्वर पाटील यांचा राजकीय प्रवास हा तळागाळातील एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला आहे. पक्षाच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग, जनसेवा आणि संघटन उभारणीत त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा मजबूत संपर्क आणि पक्षनिष्ठा यामुळेच वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
नियुक्तीनंतर बोलताना पाटील म्हणाले, “ही जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी मोठा सन्मान आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तसेच आमचे मार्गदर्शक विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्ण निष्ठेने सार्थ ठरवेन. रत्नागिरी तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करून शिवसेनेचा भगवा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल.”
या नियुक्तीमुळे रत्नागिरीतील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कष्टाळू आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

