(लांजा/ रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील गोविळ-गोसावीवाडी येथील प्रविण दत्ताराम तावडे (वय ३५) हे लांजा येथील दर्गा रोड परिसरातून बेपत्ता झाले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तेथून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण तावडे हे ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास लांजा येथील दर्गा रोड परिसरात होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. कुटुंबीयांच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून त्यांना पळवून नेल्याचा आरोप त्यांच्या पत्नी प्रांजल प्रविण तावडे (वय ३४, व्यवसाय गृहिणी, रा. गोविळ-गोसावीवाडी, ता. लांजा) यांनी फिर्यादीत केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेत अॅपचा वापर झाला होता का, याबाबतही नोंदीत उल्लेख आहे. मात्र, त्यासंबंधीचा तपशील उपलब्ध नाही. प्रविण तावडे यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


