(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण केल्याचा, चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आणखी एका आरोपीला रत्नागिरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. प्रथमेश सचिन भाटकर असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश दिला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७/२०२६ अन्वये हा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हा महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनावर चालक म्हणून काम करत असून, जनावरांची वाहतूक करीत होता. ८ एप्रिल २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कांदे येथून जनावरांची वाहतूक करून तो रत्नागिरी तालुक्यातील वेटोशी येथे पोहोचला होता. त्यानंतर आंबा घाटाच्या मार्गाने जात असताना रात्री सुमारे ८.१५ वाजता दख्खन स्पॉट येथे काळ्या रंगाच्या थार वाहनाने त्याचे वाहन अडविले. त्यानंतर थार आणि पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून आलेल्या व्यक्तींनी जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचा आरोप करत फिर्यादीला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याला जबरदस्तीने इनोव्हा वाहनात बसवून नेण्यात आले. साखरपा येथील पेट्रोल पंपाजवळ चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. फिर्यादीकडील २५ हजार रुपये घेतल्यानंतर उर्वरित २५ हजार रुपये न दिल्यास आंबा घाटात ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणातील संशयित आरोपी क्रमांक २ प्रथमेश सचिन भाटकर याने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४८३ अन्वये नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. यापूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, नव्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने तपास पूर्ण झाल्याची आणि आरोपपत्र दाखल झाल्याची बाब विचारात घेतली. प्रथमेश भाटकरचे वय २४ वर्षे असून, अशा प्रकारचा गुन्हा त्याच्याकडून प्रथमच घडल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने नमूद केले आहे. तो सुमारे पाच महिन्यांपासून कारागृहात असून कुटुंबातील कमावता सदस्य असल्याची बाबही न्यायालयाने विचारात घेतली आहे. खटल्याचा निकाल नजीकच्या भविष्यात लागण्याची शक्यता नसल्याने त्याला अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवणे त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
मात्र तपास अधिकाऱ्यांनी संशयित भाटकरच्या जामिनाला विरोध करत अर्जदार हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा दावा केला होता. तसेच, अन्य आरोपींशी त्याचा संपर्क असल्याचे आणि कथित कटाच्या ठिकाणाबाबत त्याने माहिती दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने संशयित आरोपी प्रथमेश भाटकर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाने प्रथमेश भाटकर याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार सादर केल्यानंतर सोडण्याचे आदेश दिले आहेत. खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याने फिर्यादी किंवा साक्षीदारांशी संपर्क साधू नये, त्यांना भेटू नये अथवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच, त्याने न्यायालयात नियमित हजर राहणे बंधनकारक असून, अटींचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची मुभा तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
यापूर्वी न्यायालयाकडून तिघांना जामीन
याच प्रकरणात यापूर्वी सरवेश सुभाष कीर (वय २२), शार्दुल सुनील कीर (वय २४) आणि संतोष बाळू गोसावी (वय ३८) या तिघांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २८ जुलै २०२६ रोजी त्यासंबंधीचा आदेश दिला होता. त्यामुळे प्रथमेश भाटकर याला जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणात आतापर्यंत जामीन मिळालेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. या प्रकरणात फरहान रशीद मुल्ला व इतर आरोपींसह प्रथमेश सचिन भाटकर, सरवेश सुभाष कीर, धर्मलिंगम विजयकुमार नाडर, भूषण बिपेंद्र सावंत, आरबाज माजिद बांगी, शार्दुल सुनील कीर, संतोष बाळू गोसावी, यश गिरीश पुजारी आणि शादाब गणी बलबले या आरोपींची नावे नमूद आहेत.


