(लांजा / वार्ताहर)
जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना १२ बोअरची बंदूक आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे. अंजणारी ते शिरंबवली या डांबरी रस्त्यावरील ओवलाच दांड परिसरातील झाडीझुडपांमध्ये गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दीपक वसंत पाष्टे (वय ३३, रा. पाष्टेवाडी, अंजणारी, ता. लांजा) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत (वय ३५, रा. कशेळी नाणिज, ता. जि. रत्नागिरी) या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश चंद्रकांत आर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे गस्तीवर असताना अंजणारी-शिरंबवली रस्त्यालगतच्या झाडीमध्ये दोघे संशयास्पदरीत्या दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे सुमारे १० हजार रुपये किमतीची एक वापरती १२ बोअरची बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि रात्रीच्या वेळी वापरण्यात येणारी बॅटरी (टॉर्च) असा एकूण १० हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल विनापरवाना असल्याचे आढळले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
प्राथमिक चौकशीत हे दोघे जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय हत्यार अधिनियम १९५९ च्या कलम ३(१)/२५ सह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार दोन्ही संशयितांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


