( चिपळूण )
वारोली (ता. चिपळूण) येथे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय म्हणून राबविण्यात आलेल्या नैसर्गिक झऱ्याच्या पुनर्जीवनासह पाणीपुरवठा प्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) उत्साहात पार पडले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या आर्थिक सहकार्याने आणि दिगंत स्वराज फाउंडेशनच्या अंमलबजावणीतून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ चिपळूण व रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी, पंचायत समिती चिपळूणचे सभापती, जिल्हा परिषद रत्नागिरीचे स्थायी समिती सदस्य तसेच परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते. दिगंत स्वराज फाउंडेशनच्या टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी केला.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक झऱ्याचे पुनर्जीवन.
झऱ्याभोवती मृद व जलसंधारणाची कामे करून जलसाठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भूजलपातळी सुधारण्यास मदत होत असून परिसरातील नैसर्गिक जलचक्राला बळकटी मिळत आहे.
प्रकल्पाअंतर्गत सुमारे ४ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून झऱ्यातील पाणी गावापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. तसेच सहा पाणीसाठा टाक्यांद्वारे पाण्याचे नियोजनबद्ध व समतोल वितरण सुनिश्चित करण्यात आले आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन प्रत्येक घरापर्यंत पुरवठा सुलभ होणार आहे.
या उपक्रमामुळे भूजल पुनर्भरण वाढणे, मृदा धूप कमी होणे आणि हरित आच्छादन वाढणे असे पर्यावरणीय लाभ अपेक्षित आहेत. पाणी उपलब्ध झाल्याने जंगलावरील अवलंबित्वही कमी होणार आहे. तसेच सुमारे १५ एकर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतीला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य होऊन उत्पन्नवाढीस मदत होईल. फळबाग, भाजीपाला आणि बहुपिक पद्धतींचा अवलंबही वाढेल.
महिलांसाठी हा प्रकल्प विशेष महत्त्वाचा ठरत असून, पाणी आणण्यासाठी लागणारा वेळ व श्रम कमी झाल्याने त्यांना शिक्षण, स्वयंरोजगार आणि सामाजिक उपक्रमांसाठी अधिक वेळ देता येणार आहे.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत जलसंधारण, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर आणि ग्रामस्थांचा सहभाग या घटकांमुळेच शाश्वत विकास शक्य असल्याचे नमूद केले. अशा प्रकारचे प्रकल्प इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानत या प्रकल्पामुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी समाधान व्यक्त केले.

