( दापोली )
दापोली तालुक्यातील मांदिवली–चिंचघर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ओव्हरलोड डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षा आणि ओव्हरलोड वाहनांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
मांदिवली पुलावर 18 टनांपेक्षा जड वाहनांना बंदी असतानाही संबंधित डंपर सुमारे 25 ते 30 टन माल वाहून नेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. डंपरचे स्वतःचे वजन सुमारे 10 टन असल्याने एकूण 35 ते 40 टन इतकी जड वाहतूक या मार्गावर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या मार्गावर ओव्हरलोड डंपरची भरधाव वाहतूक सुरू असल्यामुळे रस्ते आणि पूल दोन्ही धोक्यात आले आहेत. अशाच प्रकारे वाहतूक सुरू राहिल्यास भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ओव्हरलोड वाहतुकीबाबत यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. ओव्हरलोड वाहतूक थांबवण्यासाठी कायमस्वरूपी तपासणी यंत्रणा उभारावी आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा ओव्हरलोड वाहतुकीचा धोका स्पष्टपणे समोर आला आहे.

