(देवळे / प्रकाश चाळके)
गणेशोत्सवाच्या निरोपानंतर आता कोकणात नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. गावागावांतील मंदिरांमध्ये, सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी आणि चित्रशाळांमध्ये आदिमायेच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. कुठे मंडप उभारणीची लगबग आहे, तर कुठे सजावटीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे, चित्रशाळांमध्ये मूर्तींना रंगसाज चढवून देवीचे रूप अधिक आकर्षक आणि जिवंत करण्यासाठी कलाकारांची मेहनत सुरू आहे.
धामणी येथील अनंत चित्रशाळेतही सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय आणि कलात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. येथे तयार करण्यात आलेल्या दुर्गामातेच्या मूर्ती आता अंतिम टप्प्यात असून, त्यांना रंगकामातून देखणे रूप देण्याचे काम सुरू आहे. युवा रांगोळीकार विलास राहटे हे देवीच्या मूर्तींच्या रंगकामात तल्लीन झाले असून, त्यांच्या कुंचल्यातून देवीचे तेजस्वी रूप साकारत आहे.
हातात कुंचला, समोर देवीची मूर्ती आणि प्रत्येक बारकावा जिवंत करण्याचा ध्यास, अशा वातावरणात विलास राहटे रंगकाम करताना दिसतात. देवीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील करारीपणा, कपाळावरील कुंकू, ओठांवरील प्रसन्नता आणि अलंकारांचा उठाव या प्रत्येक गोष्टीकडे ते विशेष लक्ष देत आहेत. रंगांच्या विविध छटांचा अचूक वापर करून मूर्तीच्या रूपात भाव आणि तेज खुलवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
चित्रशाळेतील एका बाजूला रंगांचे डबे, दुसरीकडे विविध आकारांचे कुंचले आणि समोर रांगेत ठेवलेल्या देवीच्या मूर्ती, असे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. मूर्तींच्या रंगकामाला अंतिम स्वरूप देण्यासाठी कलाकारांची लगबग सुरू असून, नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी चित्रशाळेत तयारीला वेग आला आहे.
कोकणातील सण-उत्सवांचा गावच्या मातीशी, स्थानिक कलेशी आणि भावविश्वाशी घट्ट संबंध आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाच्या आगमनाने पुन्हा एकदा गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवात देवीच्या मूर्तींना आकर्षक आणि भावपूर्ण रूप देणाऱ्या मूर्तिकारांसह रंगकाम करणाऱ्या कलाकारांचे योगदानही महत्त्वाचे ठरते.
युवा रांगोळीकार विलास राहटे यांच्या हातातील कुंचल्यातून देवीच्या मूर्तींना रंग, भाव आणि तेज प्राप्त होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी या मूर्ती सजून भक्तांच्या दर्शनासाठी विराजमान होतील, तेव्हा त्यांच्या देखण्या रूपामागे अनंत चित्रशाळेत मेहनत घेणाऱ्या कलाकारांच्या कौशल्याची आणि परिश्रमांची झलकही अनुभवायला मिळेल.


