(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरात पोलिस असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आरोग्य मंदिर परिसरातील बसस्टॉपजवळ सकाळी ९.१५ ते ९.३० या वेळेत हा प्रकार घडला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
याबाबत विजया श्रीकृष्ण सरदेसाई (वय ७०, रा. नाचणे पॉवर हाऊस, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, सरदेसाई या नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी आरोग्य मंदिर परिसरात गेल्या होत्या. त्या बसस्टॉपजवळ उभ्या असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दिशेने आली. स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत त्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चलाखीने लांबवून तो पसार झाला.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच संशयिताचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
रत्नागिरीत यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः वृद्ध महिलांना लक्ष्य करून, “दागिने सुरक्षिततेसाठी काढून रुमालात बांधा” अशी बतावणी करत दागिने लंपास करण्याच्या घटना काही काळापूर्वी वाढल्या होत्या. अलिकडच्या काळात या घटनांमध्ये घट झाली होती. मात्र मंगळवारी घडलेल्या प्रकारामुळे अशा टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

