(चिपळूण / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १७ वर्षांपासून रखडलेले असताना, शासन, प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे कोकणवासीयांचा संयम आता संपुष्टात आला आहे. वाढते अपघात, सततची वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आता थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या जनभावनेचा उद्रेक म्हणून ‘मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ने ११ जानेवारी रोजी संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
कोकणाच्या विकासाचा कणा मानला जाणारा हा महामार्ग आजवर केवळ आश्वासनांचा ढिगारा ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अपूर्ण कामांमुळे रोज घडणाऱ्या अपघातांत निष्पाप नागरिकांचे प्राण जात असतानाही सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या अन्यायाविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि रखडलेल्या कामाचा जाब विचारण्यासाठी सकाळी १० वाजता संगमेश्वर बस आगार परिसरात हे आंदोलन छेडले जाणार आहे.
“आता केवळ निवेदनांवर विश्वास ठेवण्याची वेळ संपली आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” अशी ठाम भूमिका जनआक्रोश समितीने मांडली आहे.
या आंदोलनात कोकणातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सरकारने तातडीने महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत ठोस कालमर्यादेसह हमी दिली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई–गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

