(रत्नागिरी / वार्ताहर)
वाढत्या कचरा समस्येवर शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे १० ऑक्टोबर रोजी पटवर्धन हायस्कूल येथे ‘कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य असून, दुपारी १ वाजता कार्यशाळेला सुरुवात होणार आहे.
रत्नागिरी शहरात दररोज मोठ्या प्रमाणात ओला आणि सुका कचरा निर्माण होतो. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण तसेच त्यावर प्रक्रिया न झाल्याने त्यातील मोठा हिस्सा डम्पिंग ग्राऊंडवर जातो. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील ताण वाढत असून, त्याचा पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्यावरही दूरगामी परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘कचरा व्यवस्थापन ही प्रत्येकाची जबाबदारी’ या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. घराघरांत तसेच सोसायट्यांमध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करणे, तसेच ओल्या कचऱ्याचे जागेवरच कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यशाळेत कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याच्या सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच तयार झालेल्या कंपोस्ट खताचा झाडे, बागा आणि शेतीसाठी प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान, याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ‘आंतरशालेय कचऱ्यातून कलाकृती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कचऱ्याचा पुनर्वापर, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
कचरा कमी करणे, त्याचे योग्य वर्गीकरण करणे आणि त्यातून उपयुक्त संसाधन निर्माण करणे, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा रोटरी क्लबचा प्रयत्न आहे.
या दोन्ही उपक्रमांमध्ये रत्नागिरीतील नागरिक, गृहसंकुलांमधील रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनिष नलावडे यांनी केले आहे.
“कचरा ही समस्या नसून, योग्य व्यवस्थापन केल्यास तोच कचरा उपयुक्त संसाधन बनू शकतो. आपल्या घरापासून कचरा व्यवस्थापनाची सुरुवात करून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा,” असे आवाहन रोटरी क्लबचे सचिव रोटे. आनंद चौगुले यांनी केले.


