(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रस्त्यावरून जाणारी एक बोलेरो वारंवार डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने हेलकावे घेत असल्याचे दृश्य बुधवारी रात्री वाहनचालकांना धडकी भरवणारे ठरले. मच्छी घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या या बोलेरोचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच, योगायोगाने त्याच मार्गावरून घरी परतणारे अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. कारवांचीवाडी परिसरातील गयाळवाडी येथे पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतले.
बुधवारी (७ ऑक्टोबर) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रत्नागिरीहून मच्छी घेऊन एक बोलेरो मुंबईच्या दिशेने निघाली होती. वाहनाच्या मागून अपर पोलीस अधीक्षक महामुनी यांची गाडी जात होती. पुढील बोलेरो अक्षरशः रस्त्यावर ‘होडी’ हेलकावे घेत असल्याप्रमाणे एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला झेपावत होती. वाहनाचा वेग आणि त्याची अनियंत्रित हालचाल पाहून महामुनी यांच्या सर्व प्रकार लक्षात आला.
कारवांचीवाडी जवळील गयाळवाडी परिसरात महामुनी यांनी बोलेरोला ओव्हरटेक करून वाहन थांबविण्याचा इशारा केला. बोलेरो थांबताच चालक मद्यधुंद अवस्थेत बाहेर आला. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरून आणि वर्तनावरून त्याने मद्यप्राशन केल्याचा संशय अधिकच बळावला. महामुनी आणि त्यांच्या चालकाने चालकाला धरून ठेवत ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलीस निरीक्षक पालवे हेही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेली ही बोलेरो संपूर्ण रस्त्यावर सैरभैरपणे धावत असल्याचे चित्र होते. चालकाला तो वाहन कुठे घेऊन जात असल्याचे विचारले असता, त्याने मुंबईला जाणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याची अवस्था पाहता पुढील प्रवास किती धोकादायक ठरला असता, याची कल्पनाच पुरेशी आहे. एखाद्या क्षणी वाहनावरील नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या किंवा बाजूने जाणाऱ्या वाहनाला धडक होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
मच्छी वाहतुकीचा हंगाम सुरू झाल्याने दररोज सायंकाळी रत्नागिरी शहरातून मोठ्या संख्येने बोलेरो आणि इतर वाहने मच्छी घेऊन मुंबईसह विविध ठिकाणी रवाना होतात. या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचा हा प्रकार वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न अधोरेखित करणारा ठरला आहे. त्यामुळे मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी अधिक काटेकोर करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
महामुनी यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळली
या मार्गावरून इतर वाहने सतत ये-जा करत असताना मद्यधुंद चालकाचे वाहन आणखी काही अंतर असेच धावत राहिले असते तर काय घडले असते, याचा विचारही अंगावर काटा आणणारा आहे. विशेषतः त्याला मुंबईपर्यंत जायचे असल्याचे सांगितले जात होते. अशा अवस्थेत रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास त्याने केला असता तर वाटेत किती जणांचा जीव धोक्यात आला असता, हा प्रश्नच या घटनेचे गांभीर्य अधोरेखित करतो.
महामुनी यांनी वेळीच परिस्थिती ओळखून वाहन थांबवले नसते, तर पुढे काय अनर्थ घडला असता, याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे महामुनींचे प्रसंगावधान केवळ एका मद्यधुंद चालकाला रोखण्यापुरते मर्यादित राहिले नाही; संभाव्य अपघाताची साखळी सुरू होण्यापूर्वीच ती थांबविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मात्र त्यासोबत रस्त्यावर संशयास्पद पद्धतीने धावणाऱ्या वाहनाकडे केवळ ‘वाहतूक नियमभंग’ म्हणून न पाहता संभाव्य दुर्घटनेचा धोका ओळखून तातडीने कारवाई करणे, हे या घटनेत महामुनी यांच्या प्रसंगावधानाचे ठळक उदाहरण देखील ठरले आहे.


