(जैतापूर / राजन लाड)
जैतापूर बाजारपेठेतील प्रतिष्ठित किराणा व्यापारी, आंबा उद्योजक, मितभाषी व सर्वांशी प्रेमाने जिव्हाळ्याने संवाद साधणारे कमरूद्दीन खुदबुद्दीन सय्यद (वय ७४) यांचे रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कमरूद्दीन सय्यद हे जैतापूर जामा मशिदीसमोर असलेल्या त्यांच्या किराणा व्यवसायातून गेल्या अनेक वर्षांपासून नाव कमावलेले आदर्श व्यापारी म्हणून ओळखले जात होते. समाजात शांत, सौम्य स्वभाव व सर्वांना एकत्र घेऊन चालणारे म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे एक कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या बुधवारी सकाळी जैतापूर दफनभूमीत त्यांच्यावर दफनविधी करण्यात येणार आहे. समाजाने एक स्नेही, आदर्श व्यापारी गमावल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. जैतापूर परिसरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

