(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधारेने गुरुवारी दिवसभर जोर कायम ठेवला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार सरी कोसळत असून, यंदा जून-जुलैऐवजी ऑगस्ट महिन्यातच पावसाचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १७ ऑगस्टपर्यंत रत्नागिरीसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर असाच राहणार आहे. पावसाच्या या सलग सरींमुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असले, तरी वातावरणात गारवा पसरला आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाच्या वार्षिक वेळापत्रकात बदल जाणवत आहे. यंदा जून आणि जुलै महिन्याचा कोटा अपूर्ण राहिला असून, आतापर्यंत फक्त ५५ टक्के (१८४० मिमी) पाऊस पडला आहे. साधारणपणे अडीच महिन्यांच्या या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ८० टक्के (२७०० मिमी) पाऊस अपेक्षित असतो. जून-जुलै महिन्यात पावसाचा भर असतो आणि त्याच काळात शेतीची बहुतेक कामे पार पडतात. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऑगस्ट महिन्यातच पावसाचा जोर वाढण्याची प्रवृत्ती दिसत आहे. यंदाही त्याची पुनरावृत्ती होत आहे.
शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यालयांमधील ध्वजारोहण कार्यक्रम पावसात भिजत पार पडले. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी ढगाळ वातावरणासह मधूनमधून सरी सुरूच आहेत.

