(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रस्त्यांवर उनाड गुरांचा वावर ही रत्नागिरीकरांसाठी नवी बाब राहिलेली नाही. मात्र, आता या उनाड गुरांनी चक्क रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच ठिय्या मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बलदंड बैल प्लॅटफॉर्मवर बिनधास्तपणे बसलेले असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर काही उनाड गुरे मुक्तपणे वावरताना आणि ठिय्या मांडून बसताना दिसत आहेत. प्रवाशांची ये-जा सुरू असतानाही या गुरांना कोणताही धाक नसल्याचे चित्र आहे. विशेषतः बलदंड बैल प्लॅटफॉर्मवरच बसून राहिल्याने प्रवाशांना त्यांच्यापासून सावध राहावे लागत आहे. रेल्वे स्थानक हे दररोज शेकडो प्रवाशांच्या वर्दळीचे ठिकाण. त्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सामान घेऊन धावपळ करणारे प्रवासी असतात. अशा ठिकाणी गुरांचा मुक्त वावर केवळ गैरसोयीचा विषय नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब ठरू शकतो. गुरे अचानक उठून धावली किंवा एखाद्या प्रवाशाच्या अंगावर गेली, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रेल्वे येण्याच्या किंवा सुटण्याच्या वेळी प्रवाशांची होणारी लगबग लक्षात घेता, अशा वेळी गुरांमुळे निर्माण होणारा धोका अधिक गंभीर ठरू शकतो. ‘या उनाड गुरांमुळे एखादा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?’ असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्यांवरील उनाड गुरांच्या समस्येकडे सातत्याने लक्ष वेधले जात असताना आता त्यांचा थेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलेला वावर हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन प्लॅटफॉर्मवरील गुरांचा वावर रोखावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच जर प्लॅटफॉर्मवर गुरांचा ठिय्या कायम राहणार असेल, तर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवालही आता उपस्थित होत आहे.
काम सुरू असल्याने प्लॅटफॉर्म अरुंद
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सध्या कामकाज सुरू असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी उपलब्ध जागा आधीच मर्यादित झाली आहे. रेल्वेची प्रतीक्षा करताना प्रवाशांची गर्दी अरुंद जागेत एकवटत असताना त्यातच बलदंड उनाड गुरांचा प्लॅटफॉर्मवर मुक्त वावर सुरू असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. गर्दीच्या वेळी एखादा बैल अचानक उठून धावला किंवा प्रवाशांच्या दिशेने झेपावला तर बचावासाठी पुरेशी जागाही उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेली अरुंद जागा आणि त्यात भर पडलेला उनाड गुरांचा धोका, ही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची बाब आहे.

