(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी )
चिपळूण येथील ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड’मधील कथित आर्थिक अनियमितता, मनमानी कर्जवाटप आणि ठेवीदारांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सभासदांनी आता निर्णायक टप्प्यावरची लढाई छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहावा, या प्रमुख मागण्यांसाठी विकास महादेव हादवे आणि अकबर मूसा शिकलकर हे येत्या ४ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय छत्रछाया लाभत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. सहकार विभागाने यापूर्वी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात गैरव्यवहार निदर्शनास येऊनही, संबंधित संचालक मंडळाशी निगडित व्यक्तींच्या राजकीय प्रभावामुळे चौकशीला जाणूनबुजून ‘ब्रेक’ लावण्यात आल्याचा दावा हादवे यांनी निवेदनाद्वारे केला आहे. या वादाला आणखी तीव्रता देणारी बाब म्हणजे, प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप. २५ मार्च २०२६ रोजी सभासद रुपेश पवार उपोषणास बसले असताना त्यांच्यावर आणि पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत, आंदोलकांनी ‘दहशतीचे वातावरण’ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. तसेच माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने संशय अधिकच गडद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अकबर शिकलकर यांनी स्वतःचे सभासदत्व बेकायदेशीररीत्या रद्द केल्याचा आरोप करत, हा प्रकार ‘तक्रारदारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न’ असल्याचे म्हटले आहे. चुकीची कारणे देत आपले हक्क हिरावले जात असून, याविरोधात पुराव्यांसह लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, ४ मे रोजीच्या उपोषणादरम्यान जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाकडे कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. सामान्य नागरिक, निवृत्तीवेतनधारक आणि लहान ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांशी निगडित हा प्रश्न असल्याने, या उपोषणाकडे आता केवळ चिपळूणच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढील घडामोडी कोणत्या दिशेने जातात, याकडे आता उत्सुकतेने पाहिले जात आहे.

