(चिपळूण / रत्नागिरी)
मुंबई–गोवा महामार्गावरील सावर्डे परिसरात कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील आणि लॉक तोडून औषधांचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत डाइजीन आणि ब्रुफेन या औषधांचे एकूण १२ बॉक्स लंपास झाले असून, चोरीस गेलेल्या मालाची किंमत १ लाख ६४ हजार २०६ रुपये ७४ पैसे आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले अनीस ककुदूस अहमद (वय २६) हे जीजे १५ एएक्स ४८३६ क्रमांकाच्या कंटेनरमधून औषधांची वाहतूक करीत होते. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ते सावर्डे येथील हॉटेल स्वामी आणि हॉटेल पंचामृत येथे जेवण करून आराम करीत होते. याच कालावधीत अज्ञात व्यक्तीने कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील आणि लॉक तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर कंटेनरमधील औषधांचे बॉक्स चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या मालामध्ये १ लाख ६ हजार ९९७ रुपये ६० पैसे किमतीचे डाइजीन टॅब्लेट मिंट १५ एस या औषधाचे सहा बॉक्स होते. या औषधाचा बॅच क्रमांक 932007D7 असा आहे. तसेच ५७ हजार २०९ रुपये १४ पैसे किमतीचे ब्रुफेन ४०० एमजी २० या औषधाचे सहा बॉक्सही चोरीला गेले. या औषधाचा बॅच क्रमांक 932807D7 असा आहे. या घटनेप्रकरणी अनीस अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता, २०२३ च्या कलम ३०५(अ) अन्वये सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरी करणारी व्यक्ती अज्ञात असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


