(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तरुण वयातील व्यक्तींच्या मृत्यूच्या नोंदी समोर आल्या असून, या घटनांनी जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. १७ वर्षीय तरुणापासून ४७ वर्षीय व्यक्तीपर्यंत विविध घटनांमध्ये मृत्यू झाले. कुठे अचानक फिट आली, कुठे अस्वस्थ वाटले, कुठे पडल्याची घटना घडली, तर कुठे रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. प्रत्येक घटनेची वैद्यकीय पार्श्वभूमी वेगळी असली तरी ‘अचानक’ या एका शब्दात या शोकांतिका गुंडाळून टाकणे पुरेसे आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाला घरी अचानक फिट आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ३५ वर्षीय तरुणाला रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. १७ वर्षे ८ महिन्यांच्या तरुणाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याची नोंद आहे. ४७ वर्षीय व्यक्ती पडल्याची घटना घडल्यानंतर उपचार घेत होती; प्रकृती अधिक बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले आणि तेथे मृत्यू झाला. ४० वर्षीय व्यक्ती रस्त्यावर अस्वस्थ अवस्थेत आढळल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनांमध्ये मृत्यूची अंतिम वैद्यकीय कारणे संबंधित वैद्यकीय तपासण्या आणि चौकशीतून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. मात्र या निमित्ताने जिल्ह्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांची तत्परता, प्राथमिक निदानाची अचूकता, आवश्यक तपासण्यांची उपलब्धता आणि गंभीर रुग्णांना उच्चस्तरीय उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
एखाद्या तरुण व्यक्तीला अचानक फिट येते आणि त्यानंतर मृत्यू होतो. अशा वेळी फिट येण्यामागील मूळ कारण काय होते, त्याची तातडीने तपासणी झाली का, आवश्यक निदान प्रक्रिया पार पडली का, याची उत्तरे महत्त्वाची ठरतात. त्याचप्रमाणे रक्ताच्या उलट्या झालेल्या रुग्णाच्या बाबतीतही मूळ वैद्यकीय कारण शोधणे आणि उपचाराची प्रत्येक पायरी तपासणे आवश्यक ठरते. ‘अस्वस्थ वाटले’, ‘पडले’, ‘फिट आली’ ही लक्षणे असू शकतात. ती प्रत्येक वेळी मृत्यूची अंतिम कारणे नसतात. त्यामुळे मृत्यूच्या नोंदीपलीकडे जाऊन वैद्यकीय कारणांचा शोध घेणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे. प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे ‘अचानक मृत्यू’ अशी नोंद करून विषय संपविण्याऐवजी नेमके काय घडले, वैद्यकीयदृष्ट्या का घडले आणि उपचारांची साखळी कुठेपर्यंत प्रभावी ठरली, याची उत्तरे शोधणे अपेक्षित आहे. तरुणांचे जीव जात असताना केवळ मृत्यूची नोंद वाढणे पुरेसे नाही तर त्या मृत्यूमागील कारणांची चिकित्सा होणे अधिक महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेने आता या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढे काय होतेय?
व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार झाले, एवढी नोंद पुरेशी मानता येणार नाही. रुग्ण दाखल झाला तेव्हा त्याची प्रकृती किती गंभीर होती, कोणत्या तपासण्या करण्यात आल्या, उपचार कधी सुरू झाले, तज्ज्ञांचा सल्ला कधी घेण्यात आला आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी हलविण्याचा निर्णय किती वेळात झाला, याची नोंद आणि त्याचे परीक्षण महत्त्वाचे आहे. विशेषतः तरुण वयातील मृत्यूंच्या प्रत्येक घटनेकडे केवळ आकस्मिक मृत्यू म्हणून न पाहता वैद्यकीय ऑडिटच्या दृष्टीने पाहिले गेल्यास त्यातून उपचारातील त्रुटी सिद्ध होतीलच असे नाही परंतु उपचारव्यवस्थेतील उणिवा असल्यास त्या पुढे येऊ शकतील आणि भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी सुधारणा देखील करता येईल. आकस्मिक मृत्यूची नोंद ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र नोंद करणे आणि कारण शोधणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. तरुण वयातील मृत्यूंची मालिका पाहता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची आता आवश्यकता आहे.


