(लांजा/ रत्नागिरी)
शेतीच्या वादातून ५४ वर्षीय शेतकऱ्याला सहा जणांनी घेरून मारहाण केल्याची घटना लांजा तालुक्यातील असोडे येथील डोंगरेवाडी परिसरात शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळी घडली. कोयतीच्या पाठीमागील बाजूने मारहाण करण्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय सिताराम पवार (५४, रा. असोडे, पोस्ट मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान ते गट क्रमांक ८४ मधील स्वतःची शेती पाहण्यासाठी गेले होते. शेतालगत असलेल्या मंगेश डोंगरे यांच्या जमिनीतील आंब्याच्या झाडाखाली विजय पवार व मंगेश डोंगरे गप्पा मारत असताना अचानक सहा जण तेथे आले.
तक्रारीनुसार, संशयित गोपीनाथ सावंत याने पवार यांना ‘इथे कशाला आलास, इथे पाऊल ठेवायचे नाही’ असे म्हणत शेती कशी करतोस ते पाहतो, अशी धमकी दिली. त्यानंतर कोयतीच्या पाठीमागील बाजूने पवार यांच्या पाठीच्या डाव्या बाजूला मारल्याचा आरोप आहे. तसेच, ‘आम्ही बारक्या हळदणकर याची माणसे आहोत’ असे सांगून हा दावा संपण्यापूर्वी तुला संपवू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर दुसरा संशयित निखील डोंगरे याने हाताच्या ठोश्यांनी मारहाण करून घरात येऊन ठोकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तिसऱ्या संशयित याने पवार यांची मान धरून हाताने मारहाण केली. तर चौथ्या अनोळखी व्यक्तीने केस धरून थापटांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाचव्या अनोळखी व्यक्तीने पवार यांचे डोके धरून सागाच्या झाडावर आपटल्याचा, तर सहाव्या व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोपीनाथ सावंत, निखील डोंगरे यांच्यासह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघा अनोळखी संशयितांचे वर्णनही तक्रारीत देण्यात आले असून, त्यामध्ये कपड्यांचा रंग, उंची, शरीरयष्टी आणि वयाचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लांजा पोलिसांकडून सुरू आहे.


