(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक २ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुका काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांचा सत्कार करण्यात आला.
राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्र तांबे (गुरुजी) यांनी ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, कार्यकारिणीतील सल्लागार वसंत आंबेलकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने बैठकीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांच्या नेतृत्वाखाली नवीन तालुका कार्यकारिणी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर तालुका कार्यकारिणीची रचना करण्यात आली असून, पुढील आढावा बैठकीत तिची अधिकृत घोषणा करण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राजापूर तालुक्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केले.
राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या या बैठकीला राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे, काँग्रेस दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा राजापूर नगर परिषदेचे नगरसेवक ॲड. जमीर खलिफे, तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, राजापूर नगर वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते देवदत्त वालावलकर, राजापूर शहराध्यक्ष अजीम जैतापकर, राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक लियाकत काझी, नगरसेवक सिद्धांत जाधव, नगरसेविका शबाना मुल्ला, अमिना गडकरी, जान्हवी वादक, काँग्रेस कार्यकर्त्या अफरोज झारी, स्वीकृत नगरसेवक महेश शिवलकर, नगरसेवक सुलतान ठाकूर, काँग्रेस कार्यकर्ते अदनान खलिफे, इम्रान मुजावर, हारून साठी, सुरेंद्र तांबे गुरुजी, गुरुनाथ आडीवरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


