(पुणे / वृत्तसंस्था)
सायंकाळचे साडेसहा वाजले असताना वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमणाऱ्या आळंदीत अचानक दिवेआगरमधील दुर्घटनेची माहिती पोहोचली. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे समोर येताच आळंदी, चऱ्होली आणि केळगाव परिसरात शोककळा पसरली. गुरुवारी (१ ऑक्टोबर) घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी १६ वर्षांचे असून ते इयत्ता ११वी आणि १२वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते. सकाळी सहलीसाठी घराबाहेर पडलेली ही मुले पुन्हा घरी केव्हाच घरी येणार नसल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
सकाळी हसतमुखाने आणि सहलीच्या उत्साहात घरातून बाहेर पडलेली मुले सुखरूप परततील, अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र, दिवेआगरच्या समुद्रात विद्यार्थी बुडाल्याची बातमी आळंदीत पोहोचताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि पालकांचा आक्रोश सुरू झाला. नेमके काय घडले, आपले मूल कुठे आहे, ते सुखरूप आहे का, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अनेक पालक आणि नातेवाईकांनी तातडीने दिवेआगरची वाट धरली.
दिवेआगरच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांमध्ये पालकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात एकच प्रार्थना होती—‘माझा मुलगा सुरक्षित असेल ना?’, ‘कोणीतरी सांगा, माझ बाळ सुखरूप आहे.’ मात्र, काही वेळातच आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पष्ट होत गेली आणि पालकांचा संयम सुटला. 42 मुले सहलीला गेल्याने नक्की कोण गेले? आणि कोण वाचले? याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. प्रत्येकजण मोबाईलवरून विद्यार्थ्यांची चौकशी करताना दिसत होते. दुसरीकडे, सुरक्षित असलेल्या मुला-मुलींचा व्हिडीओ तयार करून आळंदीतील संबंधित पालकांना पाठवण्यात आला.
सहलीसाठी घराबाहेर पडलेली मुलं पुन्हा परतणार नाहीत, ही कल्पनाच नातेवाईकांना सुन्न करून गेली. आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीवर काही कुटुंबीयांचा विश्वासच बसत नव्हता. ‘जोपर्यंत मुलाचे तोंड पाहत नाही, तोपर्यंत ही बातमीच खोटी आहे, माझा मुलगा जिवंत आहे’ असा आक्रोश घरांतून ऐकू येत होता. सकाळी हसतमुखाने गळ्यात हात घालून बाहेर पडलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यांचा मृतदेहच आता घरी येणार ही कल्पना सहन न झाल्याने पालकांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता, तर नातेवाईक आणि शेजारी-पाजाऱ्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू थांबत नव्हते. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोक, आक्रोश आणि हंबरडा याशिवाय दुसरे चित्रच उरले नव्हते. अनेक घरात सायंकाळी चुली पेटल्या नाहीत. संपूर्ण आळंदी आणि लगतच्या केळगाव परिसरात सुन्न आणि भयाण शांतता पसरली होती.
शिवच्या त्या फोनने पालकांच्या काळजाचा ठाव घेतला…
एकीकडे आठ चिमुकल्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असताना, दुसरीकडे सुखरूप वाचलेल्या ‘शिव’ नावाच्या विद्यार्थ्याने “बाबा, मी वाचलो… पण मला वेळेवर आणि आठवणीने औषध देणारे माझे जिवलग मित्र मला सोडून गेले” असे सांगत मांडलेला टाहो काळीज पिळवटून टाकणारा ठरला आहे.
आळंदीतील ‘विनर्स ॲकॅडमी’मध्ये अकरावी सायन्समध्ये शिकणारा शिव संतोष निचंग हा गुरुवारी (१ ऑक्टोबर) पहाटे ३ वाजता आपल्या वर्गातील मित्रांसोबत दिवेआगर सहलीसाठी रवाना झाला होता. शिवला शुगरचा त्रास असल्याने त्याला दररोज ठरलेल्या वेळेनुसार इन्सुलिन घ्यावे लागत होते. त्याची ही गरज लक्षात घेऊन त्याचे मित्रही त्याची विशेष काळजी घेत होते.
“शिवचे मित्र अगदी सख्या भावासारखे होते. ते त्याला वेळेवर औषध आणि इन्सुलिन घेण्याची आठवण करून देत होते. मात्र, त्या दुर्दैवी संध्याकाळी त्याचा घाबरलेल्या अवस्थेत फोन आला. तो रडत रडत म्हणाला, ‘बाबा, मी ठीक आहे; पण माझे आठ मित्र समुद्रात बुडाले,’” अशी काळजाचा ठाव घेणारी आपबीती शिवच्या पालकांनी रडतच सांगितली.
विनर्स अकॅडमीच्या सहलीत इयत्ता ११वी आणि १२वीतील ४२ विद्यार्थी आणि ६ शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये २५ मुले आणि १७ मुली होत्या. गुरुवारी पहाटे ही सहल रायगड किल्ला आणि दिवेआगर समुद्रकिनारी जाण्यासाठी निघाली होती. रायगड किल्ल्याला भेट दिल्यानंतर विद्यार्थी दुपारी दिवेआगर येथे पोहोचले. सुमारे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात उतरले. समुद्राच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दिवेआगर येथील महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यांना बोरली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकॅडमीच्या परिसरातही पालक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हातातील कामे बाजूला ठेवून अंगावरच्या कपड्यावरच अनेक पालक आणि नातेवाईक दिवेआगरच्या दिशेने रवाना झाले. ज्या हातांनी सकाळी मुलांना डबा भरून दिला, त्याच हातांनी आता आपल्या पोटच्या गोळ्यांचे पार्थिव ताब्यात घेण्याची वेळ पालकांवर आली होती.
दरम्यान, सुरक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना दिवेआगरमधील हॉटेलमध्ये हलवण्यात आले होते. सहलीपूर्वी पालकांकडून संमतीपत्रे घेण्यात आली होती, अशी माहिती अकॅडमीकडून देण्यात आली. मात्र, दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था आणि त्यांच्या देखरेखीबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकी परिस्थिती आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे.
रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासन एकमेकांच्या संपर्कात असून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह आज (दि. २) आळंदीत आणण्यात आले आहेत. सकाळी सहलीच्या आनंदात घराबाहेर पडलेली ही मुले पुन्हा घरी परतलीच नाहीत. त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांवर आता कायमची पोकळी आली आहे. दिवेआगरच्या समुद्रकिनारी घडलेल्या या दुर्घटनेने आळंदी आणि परिसराला हादरवून सोडले असून, आठ कुटुंबांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारे दुःख आले आहे.
मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे
- तन्मय दत्तात्रय वहीले (आळंदी-मरकळ रस्ता, आळंदी)
- सुमित भरत अहिरे (आवारी हॉस्पिटल समोर, आळंदी)
- प्रणव रामदास बनसोडे (वडगाव रस्ता, प्रियदर्शिनी शाळेजवळ, आळंदी)
- कैवल्य सतीश वासनकर (काळे कॉलनी, पॅराडाईज सोसायटी, आळंदी)
- सोहम तुकाराम भांडवलकर (केळगाव ग्रामपंचायत हद्द)
- राजवीर युवराज वहीले (केळगाव ग्रामपंचायत हद्द)
- यश किरण वानखेडे (जलाराम पार्क, चऱ्होली खुर्द)
- कौस्तुभ संदीप दौंड (गॉड्स काउंटी, चऱ्होली खुर्द)
दरम्यान, मृतांमधील सर्वांचे वय (16 वर्षे) आहे.


