( नवी दिल्ली )
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एप्रिल 2026 पासून क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल आणत आहे. आता ग्राहकांना क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. नव्या नियमानुसार क्रेडिट स्कोअर दर 7 दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. सध्या महिन्यात जास्तीत जास्त दोनदा अपडेट होणाऱ्या या प्रक्रियेत ही मोठी सुधारणा आहे. हा बदल आरबीआयच्या ‘ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती) निर्देश, 2025’ नुसार लागू केला जाणार आहे.
या प्रस्तावानुसार सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना महिन्यात पाच वेळा कर्जदारांचा डेटा अपडेट करावा लागेल. निश्चित केलेल्या तारखा — ७, १४, २१, २८ आणि शेवटचा दिवस — अशा असतील. आरबीआयच्या या पावलामागे क्रेडिट डेटा रिपोर्टिंग अधिक अचूक, त्वरित आणि पारदर्शक करण्याचा उद्देश आहे. यामुळे लेटेस्ट क्रेडिट स्कोअरमुळे अडथळ्यात अडकलेल्या कर्ज प्रक्रियांना गती मिळणार आहे.
पूर्वी बँका आणि वित्तीय संस्थांना सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपीरियन किंवा क्रिफ हाई मार्क यांसारख्या क्रेडिट ब्युरोंना डेटा महिन्यात एकदा किंवा दोनदा पाठवावा लागत असे. आता त्या महिन्यात एकदा मूळ डेटा पाठवतील; मात्र दरम्यान झालेल्या बदलांची माहिती तत्काळ द्यावी लागेल. यात नव्या कर्जाचे वितरण, खाते बंद करणे, कर्ज परतफेड, ग्राहकाची माहिती किंवा कर्ज वर्गीकरणातील बदल यांचा समावेश असेल. त्यामुळे क्रेडिट कार्ड बंद करणे, पूर्ण परतफेड करणे किंवा रिपेमेंट रेकॉर्ड सुधारल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसणार आहे.

