(रत्नागिरी / प्रतिनिधी)
‘तुमचे गॅस कनेक्शन आज रात्री बंद होईल’, ‘KYC तातडीने अपडेट करा’, ‘बिल भरा, अन्यथा कनेक्शन खंडित केले जाईल’… अशा संदेशांनी तुम्हालाही घाबरवले जात असेल, तर सावधान! महानगर गॅस (MGL) तसेच विविध गॅस वितरकांच्या नावाचा गैरवापर करून सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. बनावट SMS, फोन कॉल, लिंक आणि फेक अॅप्सच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक माहिती मिळवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घाई, भीती किंवा दबावाला बळी पडून कोणतेही ऑनलाइन पेमेंट करू नये, तसेच अनोळखी लिंक किंवा अॅपचा वापर टाळावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सायबर भामटे सर्वप्रथम ग्राहकांना बनावट SMS किंवा कॉल करतात. गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची, बिलाची माहिती अपडेट करण्याची किंवा KYC पूर्ण करण्याची तातडीची सूचना देऊन ग्राहकांमध्ये भीती निर्माण केली जाते. त्यानंतर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास किंवा पाठविलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांना APK फाइल किंवा AnyDesk, TeamViewer यांसारखी Remote Access अॅप्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते. ही अॅप्स मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर सायबर भामट्यांना मोबाइलचा अनधिकृत प्रवेश मिळण्याचा धोका असतो. फसवणुकीच्या पुढील टप्प्यात ग्राहकांकडून OTP, UPI PIN, ATM PIN, CVV किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती मागितली जाऊ शकते. ही माहिती मिळाल्यानंतर आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अशी गोपनीय माहिती इतरांना देऊ नये, असे पोलिसांनी बजावले आहे.
‘Connection Disconnect’, ‘Final Notice’, ‘Immediate Payment’ यांसारख्या शब्दांचा वापर करून ग्राहकांना घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडले जाते. अनधिकृत किंवा खासगी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात असल्यास तो संदेश संशयास्पद असल्याची शक्यता आहे. गॅस कनेक्शन, बिल किंवा KYC संदर्भातील माहिती तपासण्यासाठी केवळ संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत अॅप, संकेतस्थळ किंवा अधिकृत ग्राहकसेवा माध्यमांचा वापर करावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
फसवणूक झाल्यास ‘१९३०’ वर तातडीने संपर्क
सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न दवडता सायबर क्राइम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. ‘अनोळखी क्रमांकावर विश्वास ठेवू नका, घाबरून कोणतेही पेमेंट करू नका आणि कोणतीही माहिती देण्यापूर्वी अधिकृत स्रोताकडून खात्री करा,’ असा स्पष्ट संदेश रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.


