सन १९३९ मध्ये महात्मा गांधी यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांना गांधीजींच्या कार्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी, येणाऱ्या पिढ्यांना असा एक मनुष्य प्रत्यक्ष हाडामांसाच्या देहात या पृथ्वीवर चालत होता, यावर विश्वास ठेवणेही कदाचित कठीण जाईल, असे मत व्यक्त केले. त्यांचे हे विधान पुढे Out of My Later Years या पुस्तकातही प्रकाशित झाले. आईन्स्टाइन यांच्या या विधानातून गांधीजींकडे केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे, तर सत्य, अहिंसा आणि नैतिक धैर्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणणारे अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जात असल्याचे स्पष्ट होते.
गांधीजींच्या कार्याचा आणि चरित्राचा अभ्यास केला असता एक बाब ठळकपणे जाणवते—हिंसेचा मार्ग न स्वीकारताही अन्यायाविरुद्ध प्रभावी संघर्ष करता येतो, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यांचा देह १९४८ मध्ये संपला; मात्र सत्य, अहिंसा, माणुसकी आणि नैतिक धैर्य यांवर आधारित त्यांचे विचार आजही समाजाच्या विवेकाला प्रश्न विचारत उभे आहेत.
व्यापारी म्हणून भारतात आलेल्या इंग्रजांनी १८५७ च्या उठावानंतर देशाच्या विविध भागांवरील आपली सत्ता अधिक मजबूत केली. अशा ब्रिटिश राजवटीच्या काळात २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे पुतळाबाई आणि करमचंद गांधी यांच्या पोटी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. एका छोट्याशा संस्थानात जन्मलेला हा बालक पुढे केवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रमुख चेहरा बनला नाही, तर सत्य आणि अहिंसेचा संदेश जगभर पोहोचविणारे वैश्विक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आला. साम्राज्यवादाला अहिंसेच्या मार्गाने आव्हान देत त्यांनी जगाच्या राजकीय इतिहासाला संघर्षाची एक वेगळी भाषा दिली.
शालेय शिक्षणानंतर गांधीजींनी पुढील शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली. घरातील संपन्न वातावरणामुळे त्यांना सुखसोयी उपलब्ध होत्या. मात्र त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वामागे जन्मतः कोणतीही अलौकिकता नव्हती. तेही चुका करणारे एक सामान्य बालक होते. लहानपणी केलेल्या चोरीची त्यांनी वडिलांकडे कबुली दिली. त्या वेळी वडिलांनी शिक्षा करण्याऐवजी अश्रूंनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. या प्रसंगातून सत्याची ताकद आणि अहिंसेतील करुणेची शक्ती त्यांच्या मनात अधिक दृढ झाली.
गांधीजींच्या जीवनातील हा छोटासा प्रसंग त्यांच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यानंतर त्यांनी सत्याचा आग्रह आणि अहिंसेचा विचार सातत्याने जपला. पुढे याच विचारांतून सत्याग्रहाची संकल्पना विकसित झाली. गांधीजींच्या जीवनाकडे पाहिल्यास महात्मा होणे म्हणजे कधीही चूक न करणे नव्हे, तर स्वतःची चूक ओळखणे, ती प्रामाणिकपणे स्वीकारणे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणणे होय, हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो.
इंग्रजांविरुद्ध गांधीजींनी विविध आंदोलने उभारली. संघर्षाची तीव्रता कायम ठेवतानाही त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. छोट्या-छोट्या आंदोलनांना व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप देत त्यांनी देशातील सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनाच्या अनुभवातून त्यांनी भारतातही जनचळवळी उभारल्या. या संपूर्ण प्रवासात सत्य आणि अहिंसा हीच त्यांच्या संघर्षाची मूलभूत साधने राहिली.
या भूमिकेमुळे गांधीजींवर टीका झाली, विरोध झाला आणि त्यांची खिल्लीही उडवली गेली. मात्र त्यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. त्यांना आपली भूमिका प्रत्येकाला पटेलच, असा आग्रह नव्हता; परंतु स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचा त्यांचा आग्रह कायम होता. त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर आणि पोशाखावरून ब्रिटिश नेते विस्टन चर्चिल यांनी त्यांना ‘नंगा फकीर’ (Naked Fakir) असे संबोधून हिणवले. तरीही गांधीजी आपल्या भूमिकेपासून दूर गेले नाहीत. ब्रिटिश सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या लंडनमध्ये जाऊनही त्यांच्या आंदोलनाच्या मूलभूत दिशेत बदल झाला नाही.
गांधीजींच्या अहिंसेची व्याप्ती केवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापुरती मर्यादित नव्हती. दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर त्यांनी हिटलरला पत्र लिहून युद्ध टाळण्याचे आवाहन केले. त्या पत्रात त्यांनी हिटलरला ‘Dear Friend’ असे संबोधले. युद्धामुळे मानवजातीला पुन्हा रानटी अवस्थेकडे ढकलले जाईल, असा इशारा देत त्यांनी हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. विरोधकाला शत्रू समजून त्याच्याविषयी द्वेष निर्माण करण्याऐवजी त्याच्या विवेकाला साद घालणे, ही गांधीजींच्या अहिंसेची महत्त्वाची बाजू होती.
सत्य, अहिंसा, प्रेम, समता, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकता या मूल्यांचा गांधीजींनी आयुष्यभर पुरस्कार केला. या मूलभूत मूल्यांपासून त्यांनी फारकत घेतली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले, त्याचवेळी त्यांच्या विरोधकांकडून तीव्र विरोध आणि तिरस्काराचाही सामना करावा लागला. विरोधकांकडून त्यांच्या चारित्र्यहननाचे प्रयत्न झाले; परंतु त्यामुळे त्यांच्या कार्याची दिशा बदलली नाही.
१९४२ मध्ये गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ‘चले जाव’चा नारा दिला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘भारत छोडो’ ठराव स्वीकारण्यात आला आणि ‘करेंगे या मरेंगे’चा संदेश देण्यात आला होता. या आंदोलनामुळे स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले. पुढे भारत स्वतंत्र झाला. मात्र स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची फाळणी झाली आणि हिंसाचाराने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. या परिस्थितीसाठी अनेकांनी गांधीजींनाही दोष दिला. तरीही त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. टीकेला वैयक्तिक वैराचे स्वरूप देण्याऐवजी त्यांनी आपल्या कृतीतूनच उत्तर देण्याचा मार्ग स्वीकारला.
गांधीजींच्या राजकीय प्रवासात ब्रिटिश सत्ता, भारतीय राजकीय विरोधक आणि त्यांच्या काही समकालीनांकडूनही तीव्र टीका झाली. काहींना त्यांचा अहिंसेचा मार्ग अतिशय मवाळ वाटत होता, तर काहींना तोच मार्ग संघर्षात्मक वाटत होता. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकांवरही प्रश्न उपस्थित झाले. काहींनी गांधीजींमुळे क्रांतिकारकांना त्रास झाल्याचे मत मांडले. तरीही गांधीजी आपल्या मूलभूत मूल्यांपासून ढळले नाहीत.
गांधीजींच्या विचारातील एक महत्त्वाचा आधार म्हणजे आपले सत्य हे अंतिम सत्य नसून सत्याच्या शोधाचा तो एक प्रयत्न आहे, ही भूमिका. त्यामुळे स्वतःच्या विचारांचे परीक्षण करण्याची तयारी त्यांनी ठेवली. आपल्या भूमिकेवर ठाम राहत असतानाच तिचा पुनर्विचार करण्याची मानसिकताही त्यांनी जपली. म्हणून त्यांची भूमिका स्थिर होती; परंतु ती केवळ हट्ट नव्हता. सत्य, अहिंसा आणि माणुसकी या मूलभूत मूल्यांशी मात्र त्यांनी तडजोड केली नाही.
आजच्या विद्वेषपूर्ण वातावरणात आणि स्वार्थकेंद्री विचारसरणीत गांधीजींच्या सर्वसमावेशक विचारांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते. विशेषतः सोशल मीडियाच्या वेगवान जगात एखाद्या व्यक्तीविषयीचा गैरसमज काही क्षणांत हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. टीका अनेकदा वैयक्तिक द्वेषात बदलते. अशा परिस्थितीत गांधीविचार आपल्याला सत्य तपासण्याची, विरोधकाला शत्रू न मानता संवाद साधण्याची आणि लोकमताच्या दबावापेक्षा आपल्या अंतःकरणातील सत्याशी प्रामाणिक राहण्याची शिकवण देतो.
१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाली. त्यानंतरही त्यांच्या विचारांवर टीका झाली, त्यांच्या मूल्यांची हेटाळणी झाली आणि त्यांच्या कार्याची टिंगलटवाळी करण्यात आली. मात्र एखाद्या व्यक्तीला गोळीने संपविता येते; विचार आणि मूल्यांना संपविणे तितके सोपे नसते. गांधीजींच्या विरोधी विचारसरणीला त्यांच्या विचारांचे अस्तित्व नष्ट करता आले नाही. सत्य, अहिंसा आणि माणुसकी या मूल्यांवर त्यांनी उभे केलेले विचार आजही चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहेत.
गैरसमजांच्या वादळातही आपल्या मूल्यांवर ठाम राहणे, विरोधकाला शत्रू न मानणे, स्वतःच्या भूमिकेचे परीक्षण करणे आणि सत्याचा शोध सुरू ठेवणे, ही गांधीजींच्या जीवनातून मिळणारी शिकवण आजच्या अस्थिर वातावरणातही अर्थपूर्ण ठरते.
अशा या निःस्वार्थी आणि निरपेक्ष महात्म्याला त्यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
©©© श्री. माधव रतनबाई विश्वनाथ अंकलगे सर,
वाटद खंडाळा, पो. वाटद,
ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३
संपर्क – ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४


