(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी गावपातळीवर बजावलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पोलीस प्रशासन आणि ग्रामीण भागातील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्यदक्षतेचे मनापासून कौतुक केले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला प्रभावी सहकार्य करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस पाटलांनी केलेल्या योगदानाबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपस्थितांसमोर विशेष शब्दांत प्रशंसा केली.
या सन्मान सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरवामुळे पोलीस पाटलांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अधिक जोमाने आणि जबाबदारीने कर्तव्य बजावण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

