(चिपळूण /रत्नागिरी)
सामाईक जागेच्या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना चिपळूण शहरातील रंगोबा साबळे रोडवर घडली. या वादातून शिवीगाळ करून वायपरच्या काठीने मारहाण केल्याचा तसेच जागेचा विषय पुन्हा काढल्यास गाडीखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नईम निसार पिलपिले (वय ५०, रा. मिरजोळी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल इकबाल पिलपिले (वय ३८, रा. आयशा मंजिल, रंगोबा साबळे रोड, पालकर मटन मार्केटच्या पाठीमागे, चिपळूण) आणि आरोपी यांच्यात सामाईक जागेवरून वाद सुरू होता. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास रंगोबा साबळे रोडवरील ममता सेल्स कॉर्पोरेशन या दुकानाजवळ हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र, याच चर्चेदरम्यान वाद उफाळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या वेळी आरोपीने शिवीगाळ करत वायपरच्या काठीने साहिल यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर, दंडावर, खांद्यावर तसेच डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर जागेचा विषय पुन्हा काढल्यास कुटुंबातील व्यक्तींना गाडीखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाईक जागेच्या वादातून घडलेल्या या प्रकाराचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


