(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जिल्हापरिषद गटातील चाफे ते नरबे या गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक जाकादेवी येथे प्रतिक देसाई यांच्या कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता उर्फ काका देसाई, भाजपा रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष व युवा नेते प्रतीक देसाई, विविध गावातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
करबुडे जिल्हा परिषद गट आता खालगाव जिल्हा परिषद गट म्हणून निर्मितीस आला आहे. गेले अनेक वर्ष करबुडे जिल्हा परिषद गट भाजपाचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असे. अलीकडे हा जिल्हा परिषद गट खालगाव जिल्हा परिषद झाला असला तरीही या गटावर भाजपाचे वर्चस्व कायम राहिले आहे. हा पंचायत समिती व जिल्हा परिषद गट भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी भाजपचा जो उमेदवार देतील तो महायुतीचा उमेदवार असेल, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार भाजपाचे मजबूत संघटन करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी कार्यप्रवण होण्याचे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांनी केले.
गेली अनेक वर्ष माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई आणि युवा नेते प्रतीक देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची मजबूत बांधणी झाली असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. सभेप्रसंगी खालगाव जिल्हा परिषद गटामधील भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

