(चिपळूण/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गालगत बंद असलेल्या मोटार स्पेअर पार्टच्या दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने हत्याराच्या साहाय्याने उचकटून दुकानातील तब्बल १ लाख ४ हजार ९ रुपयांचा माल आणि तीन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आगवे येथे घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगवे येथील मुंबई-गोवा महामार्गालगत पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या परिसरात वैभव प्रभाकर डोगरे (४५, रा. मांडकी-कासारवाडी, ता. चिपळूण) यांच्या मालकीचे ‘साई मोटार अॅण्ड स्पेअर पार्ट’ नावाचे दुकान व गॅरेज आहे. हे दुकान रात्री बंद करून ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मोटार वाहनांचे विविध स्पेअर पार्ट आणि ऑईलचे पॅकिंग असा माल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीला गेलेल्या मालामध्ये व्हॅल्वोलिन कंपनीच्या विविध क्षमतेच्या ऑईल पॅकिंगचा समावेश आहे. याशिवाय बॉल जॉइंट सेट, बोलेरो टायर रॉड एंड सेट, टेम्पो ट्रॅव्हलर क्लच सेट, बोलेरो टू-इन-वन क्लच सेट, बोलेरो मॅक्स पिकअप पॅकिंग एंड सेट, ब्रेक पॅकिंग बूस्टर, ब्रेक पॅकिंग रोटर, ब्रेक लाइनिंग सेट आणि डिस्क पॅकिंग रोटर आदी वाहनांचे सुटे भाग चोरीला गेले आहेत.या सर्व मालाची एकूण किंमत १ लाख १ हजार ९ रुपयांपेक्षा अधिक, तर दुकानातील ३ हजार रुपयांची रोकडही चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या मालासह रोकड मिळून एकूण नुकसान १ लाख ४ हजार ९ रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुकानमालक वैभव डोगरे यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानाचे शटर उचकटण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार, चोरीला गेलेला माल आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.


