(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला असताना, त्याच्या शेजारी असलेल्या लांजा तालुक्याचा समावेश का करण्यात आला नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांनी उपस्थित केला आहे. लांजा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असून, पावसाच्या कमतरतेचा शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे लांजा तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तातडीने समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याच्या निकषावर त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, राजापूर तालुक्याच्या अगदी लगत असलेल्या लांजा तालुक्याला या निर्णयातून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे कांबळे यांनी म्हटले आहे. लांजा तालुक्यातही शेती हा अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. पावसातील तूट, त्याचा शेती उत्पादनावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेता, केवळ प्रशासकीय निकषांच्या आधारे तालुका वगळला जाऊ नये, अशी भूमिका कांबळे यांनी मांडली आहे. शेजारील तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होत असताना लांजा तालुक्याबाबत वेगळा निकष का, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
लांजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आवश्यक पाहणी करून तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


