(संगमेश्वर / एजाज पटेल)
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) यशस्वी सेवेची ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, देवरुख आगारातही कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आदर्श सेवा बजावणारे आणि प्रवाशांचे लाडके चालक मिलिंद शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मिलिंद शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि जबाबदारीची जपणूक करत प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. सुरक्षित वाहनचालना, नम्र वर्तन आणि प्रवाशांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्यांनी प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत एस.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले.
वाहतूक निरीक्षक तथा स्थानक प्रमुख तुषार कोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मिलिंद शिंदे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक दिलीप वासुदेव शिंदे, वाहतूक निरीक्षक प्रकाश सावंत, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संतोष जाधव, वाहतूक निरीक्षक सुरेंद्र रहाटे आणि मिथुन शिंदे यांच्यासह आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मिलिंद शिंदे यांच्या कार्याचा गौरव यापूर्वीही झाला आहे. चालू वर्षात त्यांनी सलग दहा वर्षे एकही लहान-मोठा अपघात न करता सुरक्षित वाहनचालना केल्याबद्दल महामंडळाकडून ‘विना अपघात सेवा’ सन्मानपत्र प्राप्त केले आहे. प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत दिलेली त्यांची निष्ठावान सेवा ही इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
एस.टी.च्या वर्धापनदिनानिमित्त मिळालेला हा सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि उत्कृष्ट सेवेची पावती मानला जात असून, देवरुख आगाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रवासी, सहकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

