(रत्नागिरी /प्रतिनिधी)
हवामानातील वाढती अनिश्चितता, बदलते पर्जन्यमान आणि शेतीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात विशेष डिजिटल शेतीशाळा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमातून आधुनिक शेती पद्धती, नैसर्गिक निविष्ठा आणि कीड व्यवस्थापन याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत पहिली डिजिटल शेतीशाळा बुधवारी पार पडली. यामध्ये पेरणीपूर्व नियोजन, बेड तयार करणे व त्यावर टोकण करणे, शून्य अथवा कमीत कमी मशागत, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी तसेच बीजप्रक्रिया या मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर खर्चात बचत आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी या तंत्रांचा उपयोग कसा होऊ शकतो, यावर भर देण्यात आला.
मोहिमेतील दुसरी शेतीशाळा ८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये जैविक आणि नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती, त्यांचा वापर आणि जमिनीच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १५ एप्रिल २०२६ रोजी ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ या विषयावर शेतीशाळा होणार आहे. सापळा पिकांचा वापर, पक्षी थांबे उभारणी, चिकट सापळे, मित्र कीटकांचे संवर्धन तसेच वनस्पतीजन्य अर्कांचा वापर करून रासायनिक अवलंबित्व कमी करण्याच्या उपायांवर या सत्रात चर्चा होणार आहे.
मोहिमेच्या अंतिम टप्प्यात २२ एप्रिल रोजी चौथी शेतीशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये भात शेतीतील सुधारित लागवड तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे. भाताची थेट पेरणी (डीएसआर), ‘श्री’ पद्धत तसेच यांत्रिक लावणी तंत्र याविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे. डिजिटल माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हवामान बदलाच्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान, पर्यायी तंत्रज्ञान आणि खर्च नियंत्रणाची दिशा मिळेल, अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

