(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडीतील एका कार्यशाळेत भारतीय नौदलाच्या पराक्रमाचा साक्षात् इतिहास साकारला गेला आहे. ‘दी मॉडेल क्राफ्ट’च्या चमूने अवघ्या २२ दिवसांत ३५ फूट आकाराची ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ या युद्धनौकेची भव्य व हुबेहूब प्रतिकृती उभारली असून, ही कलाकृती आता दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या कोलकाता येथील पी. एम. संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
टीम लीडर मयूर वाडेकर आणि त्याच्या १४ जणांच्या सहकाऱ्यांनी दिन-रात अथक परिश्रम घेत ही प्रतिकृती साकारली. रत्नागिरीत तयार झालेली ही ‘विक्रांत’ची भारतातील पहिली प्रतिकृती असल्याचा दावा मयूर वाडेकर याने केला आहे. २०१३ सालचा नेव्हल एनसीसी छात्र असलेल्या मयूरने २०१९ ते २०२१ या काळात कोचिन येथे शिप मॉडेलिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. २०१७ पासून या क्षेत्रात सक्रिय असलेल्या मयूरच्या ‘दी मॉडेल क्राफ्ट’ टीमला ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ची प्रतिकृती अवघ्या एका महिन्यात तयार करण्याची ऑर्डर मिळाली. वूड आणि जीआरपी (ग्लास रिइन्फोर्स्ड प्लॅस्टिक) या मिश्र माध्यमात प्रतिकृती उभारण्याचे आव्हान होते. मात्र सलग २२ दिवस अखंड श्रम घेत तीन टनांहून अधिक वजनाची, ३५ फूट लांबीची युद्धनौका उभी करण्यात टीम यशस्वी ठरली.
या प्रतिकृतीसाठी दीड लाख रुपयांहून अधिक खर्च झाला. वूड फिनिशिंग, सँडिंग, पार्ट फिनिशिंग, स्टील वेल्डिंग तसेच जहाजावरील एअरक्राफ्टच्या निर्मितीसाठी मोठा वेळ व कौशल्य लागले. कलाकौशल्याच्या बळावर हुबेहूब प्रतिकृती घडवणे म्हणजे ‘शिवधनुष्य पेलण्यासारखे’ आव्हान असल्याचे मयूर सांगतो; मात्र या आव्हानावर मात करत टीमने नौदलाच्या वैभवाला साकार रूप दिले आहे.

या भव्य उपक्रमात नीलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, दानियाल सारंग, निहारिका राऊत, फहद लाला, अर्श फणसोपकर, निखिल गावकर आणि संपदा हर्डीकर यांनी मोलाचे योगदान दिले. रत्नागिरीच्या भूमीत साकारलेली ही ‘विक्रांत’ची प्रतिकृती केवळ एक कलाकृती नाही, तर देशाच्या सागरी परंपरेला दिलेली जिवंत मानवंदनाच आहे.

