(रत्नागिरी / वार्ताहर)
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम्’ देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल १६ संघांनी सहभाग घेतला होता.
विद्यालयात संगीत विषयासाठी स्वतंत्र शिक्षक नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत किंवा गायनाचे कोणतेही बाह्य प्रशिक्षण मिळालेले नसतानाही विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळवले. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे सुरेल आणि प्रभावी सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते कोणत्याही व्यासपीठावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले. या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना साठे सर, नाटेकर मॅडम आणि पांचाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका संजना तारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थी कलाकारांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
सुविधांची कमतरता ही गुणवत्तेच्या आड येत नाही; जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश संपादन करता येते, हे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. या विजयामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.

