(चिपळूण / वार्ताहर)
तालुक्यातील पिंपळी–नांदिवसे मार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळून वर्ष उलटत आले तरी पुलाचे बांधकाम अपेक्षित वेगाने पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील सुमारे १४ ते १५ गावांतील नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच एमआयडीसी परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पुलाचे काम नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी केली आहे. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ६ डिसेंबर २०२६ पासून पर्यायी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
पिंपळी–नांदिवसे मार्गावरील या पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन सन २००७ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात येत असल्याचे अडरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. सन २०१७ आणि २०२२ मधील महापुराच्या काळात पुलावर सुमारे १५ फूट पाणी गेले होते. त्यावेळी पुलाचे रेलिंग तसेच पाईपलाईनचे नुकसान झाले होते. परिणामी परिसरातील विविध मार्गांसह एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला होता.
पुलाच्या बांधकामासाठी सन २०२३ मध्ये सुमारे १.४८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानंतर हे अंदाजपत्रक सुमारे १.९८ कोटी रुपयांपर्यंत सुधारित करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. निधी उपलब्धता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे पुलाच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, २३ ऑगस्ट २०२५ रोजी नागरिक पुलावर उपस्थित असताना एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पुलाची मालकी व हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू होती. त्याचवेळी पूल कोसळला. या घटनेत उपस्थित नागरिक थोडक्यात बचावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पूल कोसळल्यानंतर परिसरातील सुमारे १४ ते १५ गावांचा संपर्क, एमआयडीसीतील दळणवळण तसेच कामगार आणि विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.
पूल कोसळल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर सुरू करण्यात आला. मात्र हा मार्ग चिंचोळा असून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने गेल्या वर्षभरात त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन पूल वाहतुकीस खुला होईपर्यंत पर्यायी मार्गाचे तातडीने मजबुतीकरण, आवश्यक रुंदीकरण आणि डांबरीकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पुलाच्या बांधकामासाठी संबंधित विभागांमध्ये दीर्घकाळ प्रशासकीय प्रक्रिया सुरू राहिल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब झाल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पुलाच्या कामाची सद्यस्थिती, सुधारित अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, कामाची प्रगती आणि काम पूर्ण होण्याची निश्चित तारीख याबाबत प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“एक वर्षापासून नागरिक संयमाने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांचे शिक्षण, कामगारांची रोजची ये-जा, गावांचा संपर्क आणि सार्वजनिक सुरक्षितता यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे,” अशी मागणी मुराद अडरेकर यांनी केली आहे.
पुलाचे काम नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण झाले नाही तसेच पर्यायी मार्गाची आवश्यक दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले नाही, तर ६ डिसेंबर २०२६ पासून संबंधित पर्यायी मार्गांवर लोकशाही व सनदशीर मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भात रत्नागिरी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, एमआयडीसी प्रशासन तसेच उद्योग विभागाकडे निवेदन आणि पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रश्नावर कोणती कार्यवाही करते आणि पुलाच्या कामाला प्रत्यक्षात किती गती मिळते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


