(चिपळूण)
कृषी दिनानिमित्त रामपूर येथे जय किसान ग्रुपच्या कृषी दूतांनी कृषीप्रेम, पर्यावरणस्नेही उपक्रम आणि शेतकरी जागृती यांचा सुंदर संगम साधला. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवन येथील ग्रामीण कृषी कार्यानुभवाचे विद्यार्थी, तसेच कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांसह जय किसान ग्रुपच्या कृषी दूतांनी कृषी दिंडी काढून गावातून रॅलीद्वारे कृषी संदेश दिले. बॅनर, घोषणांनी सजलेली ही दिंडी शेतकरी बांधवांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणारी ठरली.
प्रबोधनात्मक मार्गदर्शन व योजनांची माहिती
या वेळी कृषी दूत वैभव पवळ यांनी कृषी दिनाचे महत्त्व, शेतकरी दिनदिनी भेडसावणारी आव्हाने व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी अमित कुमार मोटे व पंकज कणसे यांनी शासनाच्या विविध कृषी कल्याणकारी योजनांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आपले जीवनमान कसे उंचावावे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
पर्यावरणपूरक उपक्रम: वृक्षारोपण आणि संवाद
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी आणि कृषी अधिकारी सहभागी झाले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शेतीप्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी प्रेरणादायी संवाद घडवून आणण्यात आला..कार्यक्रमाची सांगता जय किसान कृषी परिवाराच्या वतीने खाऊ वाटप करून करण्यात आली. यामुळे ग्रामीण एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
सदर उपक्रमास डॉ. निखिल चोरगे (मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. संकेत कदम (प्राचार्य, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय), डॉ. शमिका चोरगे (प्राचार्या, जिजामाता महिला कृषी महाविद्यालय) तसेच प्राध्यापक प्रशांत इंगवले (ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी दूत तेजस चोथे, वैभव पवळ, विराज कणसे, उदयनराजे भोसले, प्रतीक माळी, अमित माळी, पुरुषोत्तम माळी, भारतकुमार बिराजदार, मंगेश पिसे, ओंकार भापकर आणि तुषार भाबड यांनी विशेष परिश्रम घेतले.