(सातारा / वृत्तसंस्था)
मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाला असून, ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणुका मॅनेज केल्या जात असतील तर लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही, असे नमूद करत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते, ही बाब जगजाहीर झाली आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाच्या घटनात्मक स्थानाचाही उल्लेख केला आहे. निवडणूक आयोगाची स्थापना संविधानाच्या कलम 324 अन्वये करण्यात आली आहे. तसेच 1995 मधील ‘टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ‘आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले’, हा खुलासा टिकत नसल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर दोन सदस्यांपैकी कोणी तरी सत्य सांगत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतभेद असू शकतात; मात्र, कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.


