(रत्नागिरी / वार्ताहर)
यंदाच्या ई-पीक पाहणीसाठी शासनाकडून वापरण्यात येत असलेल्या DCS ॲपमध्ये करण्यात आलेल्या नव्या अपडेटमुळे कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ई-पीक पाहणीच्या वेळी आंबा पिकाची माहिती नोंदविताना ‘Seed Variety’ या पर्यायामध्ये कोकणातील आंब्यासाठी केवळ ‘कोकण रुची’ ही व्हरायटी उपलब्ध आहे. ‘हापूस’ किंवा ‘Alphonso Mango’ या नावाने स्वतंत्र पर्याय या ॲपमध्ये उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता हापूस आंब्याची नोंद ‘कोकण रुची’ या नावाने करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष शेतामध्ये हापूसची लागवड असताना सरकारी पीक नोंदीत त्याची नोंद दुसऱ्या नावाने झाल्यास भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा ई-पीक पाहणी १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हापूस लागवडीची नोंद ‘कोकण रुची’ या नावाने झाल्यास हापूस आंब्याची स्वतंत्र सरकारी नोंदच उपलब्ध राहणार नाही, अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भविष्यात पीक विमा अथवा विमा दाव्यांच्या पडताळणीच्या वेळी प्रत्यक्ष शेतातील पीक आणि महसूल नोंदीतील तफावत अडचणीची ठरू शकते. तसेच सातबाऱ्यावर हापूस पिकाची अचूक नोंद नसल्यास शेतकरी हापूस उत्पादक असल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध करताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हापूस उत्पादकांसाठी भविष्यात विशेष अनुदान, कृषी कर्ज, विविध योजना किंवा अन्य शासकीय लाभ जाहीर झाल्यास त्यासाठी पात्रता निश्चित करताना पीक नोंदीचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे DCS ॲपमध्ये ‘हापूस/Alphonso’ या नावाने स्वतंत्र व्हरायटीचा पर्याय तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या तांत्रिक बाबीबाबत अधिकृतरीत्या स्पष्टता होईपर्यंत हापूसची नोंद ‘कोकण रुची’ या नावाने करण्याबाबत स्पष्ट सूचना देऊ नयेत, तसेच ई-पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांनाही यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


