( रायगड )
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा अधिवेशनात मुंबई–गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 अखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली आहे. मात्र या आश्वासनानंतरही स्थानिकांचा संताप कमी होण्याऐवजी अधिकच वाढला असून जन आक्रोश समितीने तिरडी यात्रा आंदोलन छेडले. कामाची रखडपट्टी, निकृष्ट काम, वाढते अपघात आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबई–गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. खड्डेमय रस्ते, धोकादायक वळणे, अपूर्ण पूल आणि वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ६ डिसेंबर रोजी लोणेरे पुलावरून तिरडी यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.
शासन, प्रशासन आणि ठेकेदारांवर दबाव वाढावा यासाठी आयोजित केलेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोणेरे, नवघर, उसरघर, वडपाले, टेमपाले आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. वारंवार होणाऱ्या मुदतवाढीबद्दल आणि अपूर्ण कामांबद्दल जनतेचा रोष स्पष्ट दिसला.
- तिरडी आंदोलन का? –
पहेल–खांडपाले बायपास मार्गाचे काम पूर्णतः रखडलेले - चार मार्गिकांपैकी फक्त एकच मार्गिका सुरू, उर्वरित तीन अपूर्ण
- विद्यार्थ्यांना, मोटारसायकलस्वारांना, रिक्षाचालकांना रोज जीवघेणा प्रवास
- भरधाव वाहने आणि अवजड ट्रकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढतेय
- वारंवार आश्वासने, पण प्रशासनाचे शून्य प्रत्यक्ष काम
- काम त्वरित सुरू न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा
नागरिकांच्या या रोषातूनच “तिरडी यात्रा” हा प्रतीकात्मक निषेध नोंदवण्यात आला. २०११ मध्ये महामार्गाचे काम सुरू झाले. १५ वर्षे उलटली तरी काम अर्धवटच असल्याने प्रतीकात्मक संदेश म्हणून तिरडी आंदोलन करण्यात आले.
काम का थांबले?
- भूसंपादनातील विलंब
- पर्यावरण मंजुरींमध्ये अडथळा
- ठेकेदारांची निष्क्रियता
- न्यायालयीन वाद
- वारंवार बदलणारे कंत्राटदार
या सगळ्यामुळे महामार्गाचे काम अधांतरी आहे. परिणामी खड्डे, अपूर्ण सेवा रस्ते, धोकादायक वळणे आणि दररोजचे अपघात यामुळे लोकांचा संताप वाढला आहे. या स्थितीचे प्रतीक म्हणून जनतेने तिरडी उचलून शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला.
महामार्गाचे काम कुठे-कुठे रखडले आहे?
- कोलाड, लोणेरे उड्डाणपूलांचे काम अर्धवट
- नागोठणे–वाकण फाटा पट्ट्यातील काम अपूर्ण
- इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्ते बंद; ठेकेदार बदलण्याची प्रक्रिया सुरू
- बाह्यवळण रस्ते पूर्ण होण्यासाठी किमान १ ते १.५ वर्षांचा कालावधी
- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर पूलांचे काम प्रलंबित
- अरवली–कांटे दरम्यान महामार्गाचे काम अनेक ठिकाणी थांबलेले

