(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आपल्या मातीशी असलेले घट्ट नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या भावनेतून ‘वाट कोकणाची’ हे मराठी गीत साकारण्यात आले आहे. कोकणचा निसर्ग, येथील जीवनशैली, परंपरा तसेच पूर्वजांनी जपलेल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारे हे गीत सध्या कोकणप्रेमींच्या भेटीला आले आहे.
‘वाट कोकणची – ज्योती भांडे, मालवणी टेल्स’ या नावाने हे गीत सादर करण्यात आले आहे. ज्योती भांडे आणि विजय मारापल्ली यांनी गीताचे संगीतबद्ध केले असून, लेखिका-कवयित्री ज्योती घनश्याम यांनी गीतलेखन केले आहे. कोकणच्या मातीशी असलेले नाते आणि या भूमीची ओढ गीतातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अकोल्याच्या मूळ रहिवासी असलेल्या ज्योती भांडे यांनी कोकणात भ्रमंती करताना या गीताची संकल्पना साकारली. कोकणचा निसर्ग, संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवताना निर्माण झालेल्या भावनेतून ‘वाट कोकणाची’ या गीताची निर्मिती झाली.
या संकल्पनेला पुढे भांडुपमधील ‘मिनी कोकण’ टीमने आकार दिला. या टीममधील जवळपास निम्मे कलाकार स्वतः कोकणी असल्याने गीताच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचाही स्पर्श झाला आहे. त्यामुळे या गीताशी कलाकारांचे नाते अधिक भावनिक आणि जवळचे झाले आहे.
कोकण म्हटले की निळाशार समुद्र, हिरवाईने नटलेले डोंगर, कौलारू घरे, गावाकडची जीवनशैली, सण-उत्सव आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या परंपरा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. याच कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच कोकणापासून दूर असलेल्या कोकणकरांना आपल्या मातीची आठवण करून देण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे.
‘वाट कोकणाची’ हे केवळ एक गीत नसून कोकणच्या मातीशी असलेल्या भावनिक नात्याचा प्रवास आहे, अशी भावना या गीतामागील संकल्पनेतून व्यक्त होते. कोकणचा वारसा आणि पूर्वजांनी जपलेल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारलेले हे गीत कोकणप्रेमींसाठी विशेष ठरत आहे.
कोकणच्या मातीचा सुगंध आणि या भूमीची हाक अनुभवण्यासाठी ‘वाट कोकणाची’ हे गीत नक्की ऐकावे आणि मित्र-परिवारासोबत शेअर करावे, असे आवाहन गीताच्या टीमकडून करण्यात आले आहे.


